संतोष पवार
पुणे : शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न आणि मागण्या संदर्भात आपण शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत असुन त्याबाबतीत शासनही सकारात्मक असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले. गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध शाळांना भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, अंथुर्णे (इंदापूर) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या भेटीवेळी बोलताना आसगावकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शाळांमधील १५० विद्यार्थी पटाऐवजी १०० विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राहय धरुन मुख्याध्यापक पदास संरक्षण मिळणे संदर्भात निर्णय झाला आहे. शिक्षकेत्तर संच मान्यता, पोषण आहार मानधन वाढ, नवीन पद भरती, जुनी पेन्शन योजना आदि प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांसंदर्भात शासनही सकारात्मक असून आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आमदार आसगावकार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी इंदापुर तालुका मुख्याध्यापक संघाच्या नुतन कार्यकारिणीचा सत्कार आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष गायकवाड, छत्रपती शाहु हायस्कूल बारामतीचे मुख्याध्यापक गणपतराव तावरे, इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार शिंदे, सहसचिव चंद्रकांत सोळसे, खजिनदार भिवाजी शिंदे, शिक्षकेत्तर संघटनेचे उपाध्यक्ष बाळु वाघ, मुख्याध्यापक संघाचे सदस्य लोंढेसर, बोराटे सर, साबळे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.