युनूस तांबोळी
(Ramadan) शिरूर : रमजान पर्वास गुरूवार ( ता. २३ ) तरावीह नमाज पासून सुरूवात झाली असून शुक्रवारी पहिल्या रोजाला प्रारंभ झाला. शहरापासून ते ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांमध्ये फळांच्या खरेदीसाठी रेलचेल पहावयास मिळाली.
पहाटे सर्वप्रथम मुस्लिम बांधवांनी पहिल्या रोजाची सहेरी केली. सुर्योदयापूर्वी सहेरी करत रोजा केला जात असल्याने सकाळी सव्वापाचच्या पूर्वी सहेरी करून पाण्याचे सेवन केले. त्यानंतर दुवा पठण करून रोजा केला. सायंकाळी सूर्यास्तानंतर ६ वाजून ५० मिनीटांनी रोजा सोडला.
दरम्यान, नमाज, कुराण पठण करण्यात आले. शुक्रवार चा दिवस असल्याने पहिला जुम्मा नमाज पठण करण्यात आली. बहुतेक ठिकाणी चिमुकल्यांनी देखील रोजा करत आपली श्रद्धा व्यक्त केली. चार वाजेनंतर रोजा इप्तारीसाठी लागणारे खाद्य पदार्थ, थंड पेय, फळ फळाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. तसेच समाज बांधवांची खरेदीची लगबग दिसून आली. एकूणच मुस्लिम बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
शुक्रवारी पहिला जुम्मा विशेष नमाज पठण…!
शुक्रवारी पहिला जुम्मा विशेष नमाज पठण साठी मोठी गर्दी झाली होती. काही मशिदीच्या प्रवेशव्दारास लागून नमाजसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. नमाज संपन्न होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची भेट घेत रमजान का पहिला रोजा आणि जुम्मा मुबारक असे म्हणत शुभेच्छा दिल्या. सोशल मिडीयावर देखील रमजान का चॅांद मुबारकच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला.