विशाल शिंदे

खेड शिवापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांना विविध नियम व सूचना देण्यात आल्या आहेत. ९ सप्टेंबर रोजी नक्षत्र हॉल, खेड शिवापूर येथे सकाळी ११ वाजता पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. यावेळी सुरक्षित व आनंददायी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेश मंडळांनी ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असून, मंडळ नोंदणीकृत नसल्यास पोलीस ठाण्याकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. परवानगी घेताना गणेश स्थापना तसेच विसर्जन मिरवणुकीची तारीख नमूद करावी आणि ठरलेल्या दिवशीच विसर्जन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

वर्गणी गोळा करताना नागरिकांवर कोणताही दबाव आणू नये. वर्गणीदाराच्या इच्छेनेच वर्गणी घ्यावी. जबरदस्तीने वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला. बॅनर लावताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक असून, वादग्रस्त मजकूर किंवा गुन्हेगारांचे फोटो बॅनरवर लावू नयेत. विसर्जनानंतर बॅनर तातडीने काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गणेश मंडळांनी मंडप उभारताना वाहतुकीसाठी रस्ता खुला ठेवावा. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रस्ता बंद करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये. धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे देखावे करू नयेत, असे पोलिसांनी सांगितले.
गणपती स्थापना झाल्यापासून विसर्जनापर्यंत २४ तास मंडळाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची उपस्थिती ठेवावी आणि त्याची नोंद रजिस्टरमध्ये करावी. पाहणीसाठी येणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची रजिस्टरवर सही घ्यावी. मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच किमान एक कॅमेरा गावाला भेट म्हणून देण्याचे आवाहन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीसाठी डीजेला बंदी असून, ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. विसर्जनाच्या दिवशी लेझर लाईट वापरण्यासही बंदी आहे. मिरवणुकीत दारू पिऊन सहभागी होऊ नये. वाद, भांडण अथवा कायदा-सुव्यवस्था बिघडविणारा प्रकार घडल्यास संबंधितांवर तसेच परिस्थितीनुसार मंडळावरही गुन्हा दाखल केला जाईल.
गणेशोत्सवात सामाजिक, समाजप्रबोधनात्मक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. विद्युत रोषणाई करताना जाणकार व्यक्तीकडूनच व्यवस्था करून घ्यावी व मुख्य विद्युत लाईनवर थेट आकडा टाकू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.
“नियमांचे पालन करा, सुरक्षित उत्सव साजरा करा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी केले. नियमांचे उल्लंघन करून कोणताही गैरप्रकार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राजगड पोलिसांनी गणेश मंडळांना दिला.







