पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: पुणे ते शिरुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ या प्रस्तावित महामार्गाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत, संपूर्ण कामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे संचालक यांसह मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

नुकसानभरपाई न देता जमिनीचा ताबा घेणे आणि परवानगीशिवाय वृक्षतोड करणे अन्यायकारक असल्याचे सांगत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच काम सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

पुणे शिरुर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे कोंढापुरी हद्दीतील शेतकरी,रस्त्यालगतचे व्यावसायिक आणि रहिवाशी बाधित होण्याची शक्यता आहे. बाधित शेतकऱ्यांकडून हरकती मागविण्यात आल्या नाहीत. तसेच त्यावर सुनावणी देखील घेण्यात आली नाही. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न करता आणि बाधित शेतकऱ्यांसह व्यावसायिक व निवासी बांधकाम मालकांना कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई न देता कामे करण्यात येत असल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला असून, त्यामुळे शासन नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक येथील श्री खंडोबा मंदिरात पार पडली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या हक्काबाबत चर्चा करण्यात आली.मोजणी प्रक्रिया पूर्ण करुन कजाप करण्यात यावा,भूसंपादन कार्यवाही नियमानुसार पार पाडावी, शेतकऱ्यांच्या हरकती मागवून त्यावर सुनावणी घ्यावी व बाधित शेतकरी, रहिवासी व व्यावसायिक यांना नियमानुसार भरपाई देण्यात यावी,अश्या मागणी करण्यात आल्या.या सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोंढापुरी हद्दीतील शेतामध्ये कोणतेही काम करु नये, असा निर्णय कोंढापुरी येथील बैठकीत घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिरुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान शेतातील झाडे विनापरवाना तोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वृक्षतोंडीची सखोल चौकशी करुन त्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.







