सातारा: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर (Raigad Accident) असलेल्या महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक अपघात घडला. हर्णे येथे पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील तरुणांची स्कॉर्पिओ गाडी पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत गाडीतील सर्व 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील 5 तरुणांचा समावेश असल्याने संपूर्ण गावावर तीव्र शोककळा पसरली आहे. एकाच गल्लीतील 5 जिवलग मित्र या अपघातात दगावल्याने गावात हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत आहे.

या अपघातात जीव गमावलेल्या रितेश लोखंडेच्या वडिलांनी अत्यंत जड अंतःकरणाने या प्रसंगाची माहिती दिली. “शनिवारपासूनच माझ्या मनात सतत धाकधूक होत होती. मी दिवसभरात मुलांना किमान 50 ते 60 वेळा फोन लावला. तिकडून फोनची रिंग वाजत होती, पण कोणीच प्रतिसाद देत नव्हते.,” अशी व्यथा त्यांनी मांडली. रितेशच्या वडिलांनी पोलीस यंत्रणांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, या भीषण अपघाताची माहिती समोर आली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. आतापर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आंबेनळी घाटात पुरेशा उपाययोजना आणि संरक्षक कठडे (घाटातील भिंत) नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप आसगावच्या ग्रामस्थांनी केला आहे.







