पुणे: देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या पुणे महापालिकेला यंदा मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी देशातील आठव्या क्रमांकावर असलेल्या पुण्याला स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. शहरातील कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आलेल्या त्रुटींमुळे पुण्याची कामगिरी घसरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळा पार पडला. या वेळी देशातील स्वच्छ शहरांचा गौरव करण्यात आला. मात्र, जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुण्याला राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील एकही पुरस्कार मिळाला नाही. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
28 लाख टन जुन्या कचऱ्याचा प्रश्न कायम

पुण्याच्या घसरणीमागे उरुळी देवाची येथील सुमारे 28 लाख मेट्रिक टन जुन्या कचऱ्याचा प्रश्न आणि शहरातील सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करण्यात आलेले अपयश ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रत्यक्ष पाहणी करणारी तीन पथके येणे अपेक्षित होते. त्यापैकी पहिले पथक जून-जुलैमध्ये आले होते. मात्र, पुढील पथकांच्या भेटीबाबत अनिश्चितता राहिल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

पुण्याला पुरस्कार न मिळाल्याने काँग्रेसने महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचा आरोप केला आहे. भूमिग्रीन, कॉटन वेस्ट आणि स्वच्छतेच्या निविदांमधील आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, मागील वर्षी आठवे स्थान मिळाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी पुण्याला देशातील पहिल्या 3 शहरांमध्ये आणण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले होते. मात्र, यंदा पुरस्कारांच्या यादीतही नाव नसल्याने महापालिकेच्या स्वच्छता नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.







