पुणे: गेल्या तब्बल चार वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर असलेले ‘प्रशासक राज’ अखेर बुधवारी संपुष्टात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची सूत्रे आता नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंडचे अनुभवी नेते वीरधवल जगदाळे यांची, तर उपाध्यक्षपदी आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी ठाकरे गटातर्फे विजयसिंह शिंदे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. उपाध्यक्षपदासाठीही शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवाराने माघार घेतल्याने दोन्ही पदे बिनविरोध निवडली गेली. या निवडीमुळे पुणे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

कोण आहेत जिल्ह्याचे नवे कारभारी?
-
वीरधवल जगदाळे (अध्यक्ष): वीरधवल जगदाळे यांना प्रशासकीय आणि सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असून, यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. खेळाची आवड असलेल्या जगदाळे यांनी जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्येही महत्त्वाची पदे भूषवली आहेत. दौंड तालुक्यातील खडकी गटातून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
-
विवेक वळसे पाटील (उपाध्यक्ष): आंबेगावचे प्रतिनिधित्व करणारे विवेक वळसे पाटील यांना उपाध्यक्षपदाचा अनुभव असल्याने प्रशासनावर त्यांची पकड मजबूत मानली जाते. त्यांच्या कामामुळे ते पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात होता. यामुळे ग्रामीण भागातील अनेक विकासकामे आणि स्थानिक प्रश्न प्रलंबित होते. आता लोकनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य, शिक्षण आणि रस्ते विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.







