Pune Crime : इंदापूर : उजणी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुण-तरुणींना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार अज्ञात इसम मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी तरुणांना अडवून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर चाकू दाखवत मारहाण करत त्यांना धमकावले.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपींनी तरुणांकडील रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच एका तरुणीच्या हातातील सुमारे 20000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुण-तरुणी घाबरले होते आणि त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही.
या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक केलेल्या आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल आणि सोन्याची अंगठी असा एकूण सुमारे 41000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
उजणी धरण परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी सावध राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







