पुणे: गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा कडक भूमिका घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीत चार बेस आणि चार टॉप यापेक्षा अधिक साउंड सिस्टीम लावल्यास संबंधित गणेश मंडळावर थेट गुन्हा दाखल करून संपूर्ण साउंड सिस्टीम जप्त केली जाणार आहे. तसेच प्रेशरमेड आणि प्लाझ्मा या उपकरणांच्या वापरावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत साउंड सिस्टीमच्या संख्येबाबत जवळपास एकमत झाले. त्यानुसार निश्चित मर्यादेपेक्षा एक बेस किंवा एक टॉप जरी अधिक लावला, तरी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
साउंड सिस्टीमच्या संख्येवर मर्यादा घालण्यासोबतच कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या विशिष्ट उपकरणांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रेशरमेड आणि प्लाझ्माचा वापर केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून संबंधित उपकरणे जप्त केली जाणार आहेत. त्यामुळे मंडळांनी उत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात शहरातील नागरिकांनी आवाज उठविला आहे. काही भागांत नागरिकांनी आंदोलन करत डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी केली. ज्येष्ठ पत्रकारांच्या शिष्टमंडळानेही पोलिस आयुक्तांची भेट घेऊन ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. साउंड सिस्टीमची संख्या वाढविणे, प्रतिबंधित उपकरणांचा वापर करणे किंवा ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणे मंडळांना चांगलेच महागात पडणार आहे. आयोजकांची जबाबदारी निश्चित करून उल्लंघन झाल्यास थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने यंदाचा गणेशोत्सव ‘आवाजाच्या’ बाबतीत पोलिसांच्या रडारवर राहणार आहे.
“चार बेस आणि चार टॉपची मर्यादा ओलांडून अतिरिक्त साउंड लावल्यास मंडळावर गुन्हा दाखल करून सिस्टीम जप्त केली जाईल. प्रेशरमेड आणि प्लाझ्मासारख्या उपकरणांच्या वापरावरही बंदी आहे. उत्सव साजरा करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे; अन्यथा कडक कारवाई केली जाईल.”
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे






