पुणे: पुणे शहरातील युवकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. लवकरच पुणे पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली (Pune Police Recruitment) जाणार असून गृह विभागाने याला अधिकृत मंजुरी दिली आहे. शहराच्या विस्तारामुळे नव्या गावांचा समावेश झाल्याने ही भरती आवश्यक ठरली आहे. हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

शहराच्या भौगोलिक हद्दी वाढल्यामुळे पोलिस दलावरचा कामाचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे. सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी अवघे साडेआठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखताना अडचणी निर्माण होत आहेत.
भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात (Pune Police Recruitment)
पुणे पोलिसांनी आपली कार्यक्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती 1720 पदांच्या भरतीला अंतिम मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत आहे. ही भरती गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे. या भरतीमुळे पुणे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार असून गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
पाच नव्या पोलीस ठाण्यांची स्थापना (Pune New Police Station)
गृह विभागाने मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे आणि लक्ष्मीनगर या भागांमध्ये नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. ही ठाणे विद्यमान पोलीस ठाण्यांचे विभाजन करून निर्माण करण्यात येणार आहेत.
- कोंढवा मधून येवलेवाडी
- सिंहगड मधून नऱ्हे
- येरवडा मधून लक्ष्मीनगर
- विमानतळ मधून लोहगाव
- हडपसर मधून मांजरी
नव्या पदांची निर्मिती आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती
या भरतीतून 830 नवीन पदे निर्माण केली जाणार असून उर्वरित पदे विद्यमान रिक्त जागांमधून भरली जातील. याशिवाय दोन नवीन पोलीस परिमंडळांनाही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, पाच वरिष्ठ निरीक्षक, पाच निरीक्षक आणि विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, उच्चाधिकार समितीकडून लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
नागरिकांना मिळणार अधिक चांगली सेवा
या निर्णयामुळे पुणे पोलिस दलाची क्षमता वाढेल, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे राखली जाईल, वाहतूक व्यवस्थापन सुधारेल आणि नागरिकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जाईल. नवीन ठाण्यांच्या स्थापनेमुळे पोलिस सेवा अधिक जवळच्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि आपत्कालीन प्रसंगी त्वरित मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.







