पुणे: इस्रायल, इराण आणि अमेरिका (Pune News) यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे गंभीर पडसाद आता पुण्याच्या नागरी सुविधांवर उमटले आहेत. इंधन टंचाईचे संकट इतके गडद झाले आहे की, पुणे महानगरपालिकेला शहरातील तब्बल 18 गॅस दाहिन्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवाव्या लागल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या वैकुंठ, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, औंध, कात्रज आणि हडपसर यांसारख्या प्रमुख स्मशानभूमींमधील दाहिन्या प्रामुख्याने ‘कमर्शियल गॅस’वर चालतात. युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा पुरवठा घटला असून, केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या गॅसवर निर्बंध आणले आहेत. याचा थेट फटका महापालिकेच्या कोट्याला बसला असून, गॅसअभावी या आधुनिक दाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अचानक वाढलेल्या लाकडाच्या मागणीमुळे पर्यावरणावर ताण येत आहे. प्रशासन गॅस पुरवठादार कंपन्यांशी सतत संपर्कात आहे. मात्र, जोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणे कठीण आहे.







