पुणे: पुणे शहरातील विस्कळीत (Pune News) वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नियम मोडणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत धाडसी आणि अनोखी योजना हाती घेतली आहे. ‘पुणे ट्रॅफिक पोलीस’ (PTP) या ॲपवर वर्षभरात सर्वाधिक वाहतूक नियम उल्लंघनांची नोंद करणाऱ्या नागरिकाला 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पकडलेल्या वाहनचालकांच्या एका समुपदेशन सत्रात ही घोषणा केली. यामागील मुख्य उद्देश म्हणजे केवळ दंड वसूल करणे नसून, पुणेकरांमध्ये ‘नागरी जबाबदारी’ वाढवणे हा आहे. जेव्हा प्रत्येक नागरिकाला वाटेल की, कोणीतरी आपल्या चुकीच्या कृत्याचा व्हिडिओ बनवत आहे, तेव्हा आपोआपच नियमांचे पालन केले जाईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी स्पष्ट केले की, नागरिक आपल्या मोबाईलद्वारे ट्रिपल सीट, फुटपाथवर पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट, बेदरकार ड्रायव्हिंग आणि गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ ॲपवर अपलोड करू शकतात.
हे ॲप सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1.80 लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 1.16 लाख वाहनचालकांवर ऑनलाईन चलन फाडण्यात आले आहे. नागरिकांनी पाठवलेल्या प्रत्येक पुराव्याची पोलिसांची विशेष टीम बारकाईने तपासणी करते, जेणेकरून खोटी तक्रार केली जाऊ नये.







