पुणे: चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 1 कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे (Pune News) पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सचिन विलास कांबळे (वय 42, रा. थेरगाव) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे याने लोहगाव परिसरात खासगी कार्यालय सुरू केले होते. त्याची गेल्या वर्षी एका व्यावसायिकाशी ओळख झाली, दरम्यान आरोपीने व्यावसायिकाला गुंतवणुकीवर 7 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून, तक्रारदार व्यावसायिकाने सुरुवातीला 33 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

त्यानंतर व्यावसायिकाने त्याच्या काही परिचितांनाही या योजनेत पैसे गुंतवण्यास सांगितले. या सर्वांनी मिळून कांबळेकडे एकूण 1 कोटी 92 लाख 95 हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही काळ परतावा दिल्यानंतर आरोपीने पैसे देणे पूर्णपणे बंद केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपी सचिन कांबळेला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके करत आहेत. गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







