पुणे: महाराष्ट्र एटीएसच्या (Pune News) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तपासात झुबेर हांगरगेकर या उच्चशिक्षित तरुणाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीई (BE) पदवीधर आणि 15 वर्षांचा आयटी क्षेत्रातील अनुभव असूनही, हांगरगेकर कट्टरवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन तरुणांना जिहादचे धडे देत होता, असा गंभीर आरोप एटीएसने केला आहे.

हांगरगेकरच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू शरियत (Sharia), खिलाफत आणि गजवा-ए-हिंद हे आहे. तो कुटुंबात आणि तरुणांना शरियतची अंमलबजावणी करण्याचे मार्गदर्शन करत होता.
2015 पासून कट्टरवाद

एटीएसच्या माहितीनुसार, हांगरगेकरने सोलापूरमधील उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातील दोन नामांकित आयटी (IT) कंपन्यांमध्ये काम केले. इतका उच्चशिक्षित आणि व्यावसायिक अनुभव असूनही, त्याची विचारसरणी अत्यंत कठोर आणि कट्टर होती. तो कट्टर विचारसरणीकडे 2015 च्या सुमारास वळला, जेव्हा तो पुणे आणि हैदराबाद येथील कट्टरतावादी व्यक्तींच्या संपर्कात आला.
हांगरगेकर पुणे, सोलापूर आणि ठाणे येथे गुप्तपणे ‘सत्रांचे’ आयोजन करत होता. या सत्रांमध्ये तो तरुणांना कथितरित्या ‘जिहाद कसा करावा’ याबद्दल मार्गदर्शन देत होता. 27 ऑक्टोबर रोजी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जिहादवादी मजकूर आढळल्याने ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या उच्चशिक्षित तरुणाने मोठ्या प्रमाणात तरुणांना कट्टरवादाकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून अधिक कसून चौकशी सुरु आहे.






