पुणे: गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि अधूनमधून (Pune News) जाणवणारा टंचाईचा फटका यामुळे सर्वसामान्य हैराण असतानाच, पुण्यातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) शास्त्रज्ञांनी चक्क कचऱ्यापासून ‘डायमेथाइल इथर’ (DME) हा इंधन वायू तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हा शोध केवळ स्वयंपाकघरातील इंधनाचा प्रश्न सोडवणारा नसून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळ देणारा ठरणार आहे.
एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी ओला कचरा, उसाचे पाचट, बांबू आणि विघटन होणाऱ्या सुक्या कचऱ्याचा वापर करून ‘डीएमई’ वायू तयार करण्याची स्वदेशी पद्धत शोधली आहे. या प्रक्रियेत वापरले जाणारे उत्प्रेरक देखील भारताने स्वतः विकसित केले आहे. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे, तुमच्या सध्याच्या गॅस उपकरणांत कोणताही बदल न करता एलपीजीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत हा नवीन वायू मिसळून वापरता येतो. हा गॅस 100 टक्के नैसर्गिक स्त्रोतांपासून बनत असल्याने तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

एनसीएलचे संचालक आशिष लेले यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जर आपण आपल्या एकूण एलपीजी वापरापैकी केवळ 8 टक्के जागा या ‘डीएमई’ गॅसने भरून काढली, तरी देशाचे दरवर्षी सुमारे 9,500 कोटी रुपये वाचणार आहे. यामुळे गॅसच्या किमती नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होऊ शकते. सध्या पुण्याच्या पिरंगुट येथे एका पायलट प्रोजेक्टद्वारे दररोज 250 किलो गॅसची निर्मिती यशस्वीपणे केली जात आहे.
येत्या सहा ते नऊ महिन्यांत दररोज 2.5 टन क्षमतेचा मोठा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यानंतर व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू करण्याचे शास्त्रज्ञांचे नियोजन आहे.







