नाशिक: नाशिक येथील द्वारका सर्कल परिसरात अंडरपासचे खोदकाम सुरू असताना, तब्बल 125 वर्षे जुनी दगडी विहीर सापडली आहे. विशेष म्हणजे, दशकानुदशके काँक्रिटच्या रस्त्याखाली गाडली गेलेली असतानाही या विहिरीचे पाणी आजही अत्यंत स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे.

द्वारका परिसरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंडरपास उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खोदकाम करताना साधारण दहा फूट खोलीवर कामगारांना दगडी बांधकाम आढळले. अधिक तपास केला असता, तिथे एक सुबक आणि भक्कम बांधकामाची विहीर समोर आली. स्थानिक जाणकारांच्या मते, या विहिरीचे बांधकाम साधारण 1903 सालातील असावे. इतकी वर्षे सूर्यप्रकाश आणि हवा न मिळताही, या विहिरीतील पाण्याचा साठा आजही स्वच्छ आहे.

नाशिकमध्ये वाढते शहरीकरण आणि काँक्रिटच्या जंगलामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट होत आहेत. अशा वेळी शहराच्या मध्यवर्ती भागात सापडलेला हा पाण्याचा मोठा साठा भविष्यातील पाणीटंचाईवर कमी करू शकतो. दरम्यान, आता द्वारका येथील या विहिरीचे काय होणार? तिला बुजवून रस्ता पूर्ण करणार की तिचे जतन करून नाशिककरांसाठी पाण्याचा नवा पर्याय उभा राहणार? हा प्रश्न आता चर्चेत आहे.

आता महापालिका आणि एमआयडीसी (MIDC) प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरातन वास्तू आणि नैसर्गिक स्रोत जपून विकास साधणे, हेच खऱ्या अर्थाने योग्य ठरेल.







