पुणे: ऐतिहासिक शनिवार वाडा नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडीओनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाड्याच्या परिसरातील एका कबरीजवळ काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धार्मिक वाद पेटला आहे. या घटनेमुळे शनिवार वाडा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शनिवार वाड्याच्या आत असलेल्या कबरीजवळ मुस्लिम महिला नमाज पठण करत होत्या. दरम्यान, कबरीवर ‘हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबुल हुसेनी पीर’ असा बोर्ड लावलेला आहे. दरम्यान, कबर नेमकी कधी बांधली याबद्दल काही अधिक माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, व्हायरल व्हिडीओनंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंदू संघटनेने आणि मेधा कुलकर्णी यांनी या कबरीला अनधिकृत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “शनिवार वाडा आमच्या विजयाचे प्रतीक आहे. ज्यांनी येथे नमाज पठण केले, त्या जागेचे शुद्धीकरण आम्ही शिववंदना करून करू. अशा घटनांना इथे मुभा दिली जाणार नाही.”
हिंदू संघटनांनी कबर तात्काळ हटवण्याची मागणी करत प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शनिवार वाडा परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.






