Pune News : पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक वरंध घाट रस्ता सुमारे 1 महिना 5 दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 डीडीवरील हिर्डोशी ते वरंधा या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामादरम्यान सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन 25 मार्च 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे.

वरंध घाट परिसर दरड कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. येथे रस्ता अरुंद असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. एका बाजूला नीरा देवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्यामुळे काम सुरू असताना वाहतूक वळवण्यासाठी जागेची अडचण निर्माण होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव, निजामपूर, ताम्हिणी घाट, मुळशी, पिरंगुट मार्ग उपलब्ध असेल. तसेच कोल्हापूर किंवा सातारा दिशेने जाण्यासाठी पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सातारा किंवा पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण असे मार्ग वापरता येतील.
स्थानिक ग्रामस्थांच्या सोयीसाठी धामणदेव, हिर्डोशी आणि शिळीम परिसरात मर्यादित स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.





