पुणे : बदलीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल भिसे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमोल भिसे हा चारचाकी वाहनातून पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप असून, त्याने तेथे शिवीगाळ करत गोंधळ घातला. इतकेच नव्हे, तर निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर गाडी धडकवून आत जाण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, मंगळवारी पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अमोल भिसे याचीही दुसऱ्या पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. मात्र, नव्या ठिकाणी जाण्याऐवजी पूर्वीच्याच पोलीस ठाण्यात पुन्हा काम करण्याची संधी मिळावी, अशी त्याची मागणी होती. याच कारणावरून तो आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भिसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथेही गोंधळ घातल्याचा आरोप झाल्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भिसे मानसिक तणावातून असे वागत असल्याचे सांगितले. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, या घटनेमागे बदलीचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







