Pune News : पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मंगळवारी बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे अजित पवार यांचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी सोमेश्वर येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करताना मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच पाहिजे असे कार्यकर्त्यांनी म्हटले. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
अजित पवारांना काळे झेंडे दाखवले : त्या आधी माढ्यात झालेल्या सभेच्यावेळीही अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत असून ठिकठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगामाला आले होते. तिथे कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणाहून समजूत काढत बाहेर काढले.
बारामती, पिंपळणेरमधेही तसेच चिञ : रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी पवार यांचा नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता. या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घालून तुमची भूमिका काय असा सवाल उपस्थित केला होता. सोमवारी माढा तालुक्यातील पिंपळणेर याठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यामुळे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दावरुन आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवर, चंद्रकांत पाटील यासह विविध नेत्यांचे फोटो पुतळ्यावर आहेत. दसऱ्याच्या दिवशी ज्या पद्धतीने रावणाचे दहन केले जाते. तसच, आम्ही ही 11 मुखी सर्वपक्षीय नेत्यांचा पुतळा दहन केलाय अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आली.