पुणे : सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना एका 55 वर्षीय महावितरण कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. सुरेश रघुनाथ भोकरे (वय 55, रा. गोकुळनगर, कात्रज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते महावितरणच्या डेक्कन उपविभागीय कार्यालयात काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भोकरे हे आपल्या काही मित्रांसोबत पहाटेच्या वेळी सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. नेहमीप्रमाणे सर्वांनी पायवाटेने चढाई सुरू केली. सुरुवातीला वातावरण उत्साही होते. मात्र काही अंतर चढल्यानंतर भोकरे यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणातच ते खाली कोसळले.
घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी आणि परिसरातील इतर पर्यटकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. भोकरे यांना सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने गडाच्या पायथ्याशी आणून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
सुरेश भोकरे हे महावितरणमध्ये मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनामुळे सहकारी आणि मित्रपरिवारात शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे ट्रेकिंगदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सध्या सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. वाढत्या उष्णतेत किंवा शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त श्रम केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ट्रेकिंग करताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






