पुणे: भरदिवसा एखाद्या चित्रपटात शोभाव (Pune News) असा थरार मंगळवारी पुणेकरांनी अनुभवला. भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे अपहरण झाले आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. सुदैवाने, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
मंगळवारची दुपारी कापूरहोळ परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. अचानक एका सफेद रंगाच्या XUV कारमधून काही तरुण आले आणि त्यांनी व्यापाऱ्याच्या मुलाला बळजबरीने गाडीत ओढले. भरवस्तीत झालेलं हे धाडस पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तत्परता दाखवत पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.

रम्यान, जेऊरकडून पिसुर्टीच्या दिशेने जाणारी एक संशयित कार पोलिसांना दिसली. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिसांच्या गाड्यांचा सायरन आणि मागे लागलेला ताफा पाहून अपहरणकर्ते पुरते घाबरले. अखेर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती XUV कार थेट रस्त्याकाढच्या उसाच्या दाट शेतात जाऊन घुसली.
कार शेतात अडकताच पोलीस तिथे पोहोचण्यापूर्वीच अपहरणकर्ते गाडी सोडून शेतातून पसार झाले. पोलिसांनी धावत जाऊन गाडी उघडली तेव्हा तो 18 वर्षीय तरुण आत सुरक्षित आढळला. पोलिसांनी त्याला पालकांच्या स्वाधीन केले.







