पुणे : पुण्यातील गणेश पेठ परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा धक्कादायक शेवट झाला. वडापाव खरेदी करताना चुकून पाय लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका 28 वर्षीय तरुणाच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घरी जाऊन झोपलेल्या तरुणाचा रात्री मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव शिवम राजेश परदेशी असून तो गणेश पेठ परिसरात राहत होता. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डुल्या मारुती चौकात शिवम वडापाव घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी गर्दीत त्याचा पाय वैभवला लागला. या छोट्याशा प्रकारावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. याच वेळी वैभवने शिवमच्या छातीवर जोरदार मारल्याचा आरोप आहे.

भांडणानंतर शिवम आपल्या घरी परतला आणि झोपला. मात्र रात्री बराच वेळ झाला तरी तो उठला नाही. कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. छातीला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वैभवला ताब्यात घेण्यात आले असून फरासखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







