पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या मेट्रोच्या दर्जाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या ‘पर्पल लाईन’वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक धक्कादायक आणि मनस्ताप देणारा अनुभव आला. प्रवासी प्रवास करत असताना, अचानक एका डब्याच्या छतातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. काही वेळातच चालत्या मेट्रोच्या आत पावसाचे पाणी साचले. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ शुक्रवार, 22 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात झालेल्या जोरदार पावसाच्या वेळचा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो वेगाने पसरला. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, प्रवासी या गळतीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तरीही अनेक जण यात पूर्णपणे भिजले आहेत.
पाहा व्हिडीओ:
हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या आधुनिक मेट्रोची पहिल्याच मोठ्या पावसात अशी दुरवस्था झाल्याने, नागरिकांमधून आणि नेटकऱ्यांमधून पुणे मेट्रो प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओवर सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.







