पुणे: सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या अभिजित दिपके यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला प्रशासनाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. पक्षाचे अधिकृत संकतेस्थळ (वेबसाईट) आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून पक्षाच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली जात होती. या कारवाईवर पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत लिहिले की, “आमच्या संकेतस्थळावर तब्बल 10 लाख तरुणांनी सदस्य म्हणून नोंदणी केली होती. त्यापैकी 6 लाख जणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी केली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये या पक्षाची अधिकृत एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्स देखील बंद करण्यात आली होती. एकापाठोपाठ एक झालेल्या या कारवायांमुळे डिजिटल विश्वात तीव्र पडसाद उमटत आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मिडिया अकाऊंट्स बंद करण्यात येत असल्याने अभिजित दिपके यांनी सांगितले कि, सरकारला एका कॉक्रोचची इतकी भीती का वाटते? ही हुकूमशाही वृत्ती देशातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आम्ही लवकरच आमच्या नवीन प्लॅटफॉर्मसह परत येऊ, कारण झुरळे कधीच मरत नाहीत.”
अकाऊंट्स बंद झाल्यानंतर समर्थकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. मात्र, अभिजित दिपके यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन केले असून, कोणतीही निदर्शने किंवा घाईघाईने चुकीचे पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान, या संवेदनशील वादामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे.







