पुणे, ता. 24 : पुणे (Pune Leopard Attack) जिल्ह्याच्या उत्तर भागात सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा विषय म्हणजे बिबट्या, मागील दोन आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. तर यामध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे. मानव-बिबट्या संघर्षाने आता खूप उग्र रूप धारण केले असून हा मुद्दा शिरूर आंबेगाव जुन्नर मधील खूपच संवेदनशील विषय बनला आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी नारायणगाव आणि परिसरात बिबट आणि मानव संघर्ष चालू झाला. याला कारण होते ऊस शेती, जंगलामधील बिबट्या ऊस शेती मुळे आणि सहज शिकार मिळत असल्याने या भागात दिसू लागला. त्या वेळी बिबट्याच्या हल्ल्याची मालिका सुरु झाली, तिने आता उग्र रूप धारण केले आहे. घोडं, कुकडी आणि मीना या तीन नद्यांच्या भागात आता हजारो बिबटे वास्त्यव्यास आहेत. त्याला कारण असे आहे की, या भागात असणारे मुबलक पाणी आणि ऊसशेती.
एकट्या पिंपरखेड गावात 100 हुन अधिक बिबटे असतील असा अंदाज वन अधिकारी खाजगीत सांगतात. याच गावाच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे या निरागस मुलीचा बळी गेला आहे. आठ दिवस उलटले नाही तोच या घटना स्थळापासून फक्त दोन किमी अंतरावर भागुबाई जाधव या जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही घटनेमुळे मध्यंतरी स्थानिक नागरिकांनी बेल्हे जेजुरी राज्य महामार्गांवर रास्ता रोको करून प्रशासनास आणि राज्यकर्ते यांना धारेवर धरले होते.

या परिसरात बिबट्याची इतकी दहशत असण्याचे कारण म्हणजे इथला असा मनुष्य नाही ज्याला बिबट्या दिसला नाही. दररोज सकाळी दुपारी रात्री बिबट्या नजरेस पडत आहे. मुळात हा भाग पूर्णपणे शेती प्रधान असल्याने शेतकरी शेतात जाणारच, कारण त्यांची उपजीविका हि शेती आहे. परंतु, बिबट्याच्या दहशतीमुळे शेती करणे अवघड होत चालले आहे. गेल्या काही दिवसापासून शेतमजूरही या भागात काम करायला येण्यास राजी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था खूप गंभीर होत चालली आहे.
दरम्यान, गाई, म्हशी शेळ्या व मेंढ्या या बंद गोठ्यात ठेवाव्या लागत आहेत. बऱ्याच अंशी लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून घराला तारेचे कुंपण घातले आहे. लहान मुलांना शाळेत सोडवणे आणि परत घरी आणण्यासाठी पालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेतीमुळे या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. परंतु, सध्याच्या घडीला शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र असून आम्हाला बंदुकीचा परवाना द्या आणि बिबट्याला मारण्याची परवानगी द्या नाहीतर आम्हाला तरी गोळ्या घाला अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी या भागाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
नागरिकांच्या सरकारकडे मागण्यांचं साकडं
बिबट्या निर्मूलनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या भागात वन विभागाची स्पेशल टास्क फोर्स स्थापन करावी. या भागात वन विभाग आहे. तिथे बिबट्यासाठी बंदिस्त अभयारण्य तयार करावे. बिबट जातींचे प्रजनन दर जास्त असल्याने त्यांची नसबंदी करावी आणि पकडलेले बिबटे आजूबाजूच्या गावात न सोडता त्यांना सुरक्षित आणि बंदिस्त जंगलात ठेवावे. याबाबत ग्रामस्थांनी सरकारला निवेदन दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अजून किती बळी गेल्यावर कारवाई करणार?
स्थानिक पुढारी या प्रश्न बाबत फारसे गंभीर दिसत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवन्या सारख्या अजून किती निष्पाप आणि निरागस बाळांचा जीव गेला तरी गेंड्याच्या कातडीचे प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. यामुळे अजून एका जेष्ठ महिलेचा बळी गेला. वन विभाग या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहे. एकाच ठिकाणी तीन बिबटे जर सापडत असतील तर अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. मात्र सध्यातरी हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.







