Pune Bus Accident : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथे आराम बस आणि माल ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. आराम बसने पुढे उभ्या असलेल्या माल ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत बसमधील तब्बल ४३ प्रवासी जखमी झाले आहेत. ७ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
जखमींवर प्राथमिक उपचार मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि गंभीर जखमींना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी नेपाळचे यात्रेकरू भाविक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मालट्रक हा पुण्याकडे जात असताना काही वेळ रस्त्याच्या कडेला उभा होता. मंचर मार्गे पुण्याच्या दिशेने आराम बस जात असताना उभा असलेला ट्रक बस चालकाच्या लक्षात आला नसल्याने ट्रकच्या मागील बाजूस बसची जोरदार धडक बसली.
यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना जोरदार धक्का बसला. प्रवाशांनी आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि ये-जा करणारे नागरिक मदतीसाठी धावून आले. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.