पुणे: पुण्यातील बंडगार्डन रोड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत परराज्यांतील मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित 2 तरुणींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

संगमवाडी-बंडगार्डन रोडवरील एक्साइज कॉलनीजवळ असलेल्या हॉटेलमध्ये एजंटांच्या माध्यमातून तरुणींना आणून हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले. त्यानुसार, ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या (HTU) पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला संबंधित ठिकाणी पाठवले.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीला दुजोरा मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान 2 तरुणींची सुटका करण्यात आली. पंचतारांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणात रोहन उर्फ राजकुमार (वय 32), विवेक उर्फ मयंक कबीर (वय 34) आणि विक्रम उर्फ पीयूष (वय 34) या तिघांसह त्यांच्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही आसाममधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.







