गणेश सुळ
केडगाव : काही महिन्यांपूर्वी अंकुश माणिक चोरमले (रा. गणेगाव, वाघाळे) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनी त्यांचा व पत्नीचा भारतीय डाक विभागाचा अपघाती विमा काढला होता. वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी यासंदर्भात माहिती संकलित करून संबंधित कुटुंबास मदत मिळण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले.
भारतीय डाक विभागाची नवीनच ३९९ रुपयांत दहा लाख रुपये अपघात विम्याची योजना सुरु करण्यात आली होती. पोस्टमन नामदेव गवळी यांनी वरिष्ठ अधिकारी योगेश वीर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली व परिसरात या अपघाती विम्याचे गावोगावी मेळावे घेतले होते. मयत अंकुश चोरमले यांचा लोणीकंद येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. पोस्टाच्या मेळाव्यात सहभाग घेऊन त्यांनी त्यांचा व पत्नीचा अपघाती विमा उतरवून घेतला होता. त्यानंतर महिनाभरातच गणेगाव वाघाळे रोडवर अंकुश चोरमले यांचा अपघातात मृत्यू झाला.
पोस्टाचा अपघाती विमा काढल्यामुळे मृत चोरमलेंच्या कुटुंबाला आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे सुमारे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली. पोस्टाचा व बजाज आलियांजचा विमा काढल्यामुळे चोरमले कुटुंबाला आर्थिक हातभार मिळाला आहे. चोरमले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
चोरमले यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब खचून गेले होते. परंतु, पोस्टमन गवळी यांनी चोरमले कुटुंबाला मानसिक धीर देत विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. शवविच्छेदन अहवाल, पंचनामा अशा अनेक अडचणी सोडवत मयत अंकुश चोरमले यांच्या वारसांना १० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मिळवून दिली. रकमेचा धनादेश सुपूर्द करताना सारिका चोरमले यांनी पोस्टमन गवळी यांचे मनापासून आभार मानले.
यापुढेही कायम असाच प्रयत्नशील राहीन
भारतीय डाक विभागाच्या योजना अत्यंत लाभदायक असून, त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा. आजपर्यंत अनेक कुटुंबांना मदत मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा केला व यापुढेही कायम असाच प्रयत्नशील असेन.
– नामदेव गवळी, पोस्टमन
पोस्टमन गवळी यांनी दिला मानसिक आधार
माझ्या पतीचे अपघाती निधन झाल्याने मी खचून गेले होते. माझी एकट्याची विमा कंपनीशी लढण्याची ताकद नव्हती. परंतु, पोस्टमन गवळी यांनी मानसिक आधार दिला. स्वतः क्लेम कंपनीशी वेळोवेळी भांडून त्यांनी अनेक अडचणी सोडविल्या. गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली आहे. रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे. गेलेली व्यक्ती पैशाने परत येत नाही. पण मुलांच्या भवितव्यासाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे.
– सारिका चोरमले, अंकुश चोरमले यांच्या पत्नी