उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शितोळे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजूला जमीन असलेल्या काही शेतकऱ्यांनी हा रस्ता कोरला असून त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहने चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरु नाही झाले तर शिंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
शितोळे मळ्याकडे जाणारा हा रस्ता 16 फुट असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर शेतकऱ्यानी हा रस्ता कोरून कोरून 7 ते 8 फुट राहिला आहे. त्यातच शुक्रवारी (ता. 12) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास याच रस्त्यावरून एक चारचाकी थेट रस्त्यावरून शेतकऱ्याच्या शेतात उतरली होती. 20 ते 25 नागरिकांच्या मदतीने हि चारचाकी कार रस्त्यावर घेण्यात आली. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
रस्त्याचे काम हे 70 टक्के झाले असून राहिलेले काम हे त्या ठिकाणी जमीन असलेले ठराविक शेतकरी हे काम होऊ देत नसल्याचा, आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी व काही नागरिकांनी केला आहे. पाऊस पडल्यानंतर मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याला निधी ही उपलब्ध झाला असल्याची माहिती मिळत आहे. या रस्त्यावरून उरुळी कांचन, शिंदवणे, सासवड, जेजुरीकडे जाणाऱ्या नागरिकांनी मोठी वर्दळ आहे. त्यातच पावसाळ्यात छोटे -मोठे अपघात होत आहेत. शाळेतील मुलांच्या बसेस तसेच अन्य गाड्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातात दुखापत झाली तर सबंधित शेतकऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शितोळे मळ्यातील ग्रामस्थांनी बैठकीत केली होती. शितोळे मळा येथील रस्त्याचे काम सुरु नाही झाले तर शिंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.