दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील हार्मनी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. घातक कचऱ्याची अयोग्य साठवणूक, परिसरातील प्रदूषण आणि सुरक्षेबाबतच्या गंभीर तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागानेही या कंपनीला यापूर्वी बंदीचे आदेश दिले होते. त्यानंतरही उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानले गेले आणि संबंधित यंत्रणांनी कठोर भूमिका घेतली. मंडळाच्या तपासणीत परिसरात कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि रसायनांमुळे स्थानिक भागावर परिणाम होण्याची शक्यता समोर आल्याचे समजते. यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

आता कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन बंद ठेवावे लागणार आहे. आवश्यक सुधारणा, सुरक्षा उपाय आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अटी पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, कंपनीला अनेक संधी देऊनही त्यांनी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न उभारल्याने प्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडा यांनी कायदेशीर बडगा उगारला आहे. त्यांनी केडगाव/बारामती विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि एमआयडीसी कुरकुंभचे कार्यकारी अभियंता यांना कडक आदेश दिले आहेत की, या प्रदूषणकारी हार्मनी कंपनीचा वीज आणि पाणी पुरवठा तात्काळ 48 तासांच्या आत खंडित करण्यात यावा.
दरम्यान, या धडाकेबाज कारवाईमुळे कुरकुंभ परिसरातील बेकायदेशीरपणे तोडपाणी करून आणि नियमांना पायदळी तुडवून कंपन्या चालवणाऱ्या रासायनिक कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत







