भिगवण : भिगवण ग्रामपंचायत हद्दीतील वेश्या व्यावसाय करणाऱ्या हॉटेल आनंदवर भिगवण पोलिसांनी छापा टाकून ३ महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. शुक्रवारी (ता. २२) संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भिगवणसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नामदेव बाळासो बंडगर (वय- ४०, रा. मदनवाडी, ता. इंदापुर) गजानन लक्ष्मण ठाकुर (वय- २४, सध्या रा. आनंद हॉटेल, भिगवण, ता. इंदापुर, मुळ रा. गंगाखेड जि परभणी) अशी गुन्हा दखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यातील गजानन लक्ष्मण ठाकुर याला पोलिसांनी अटक केली आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भिगवण ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल आनंद या ठिकाणी वरील दोन आरोपी हे हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल आनंदमध्ये ३ महिला मिळून आल्या. सदर महिलांची सुटका पोलिसांनी केली आहे.
नामदेव बंडगर व गजानन ठाकूर हे दोघेजण वेश्यागमनाचा व्यवसाय करून घेतात. तसेच अनैतिक व्यापार करणेस प्रोत्साहन देत असल्याने दोन्ही आरोपींवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर गजानन ठाकुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास भिगवण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस अमलदार इन्कलाब पठाण, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, महीला पोलीस अंमलदार प्रिया पवार यांनी केली आहे.