बारामती,(पुणे) : बारामती तालुक्यातील मुर्टी येथे घरगुती सिलेंडरमधील गॅस हा व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी धाड टाकली आहे. यामध्ये 37 सिलेंडरसह तब्बल 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संकेत सुरेश जगदाळे आणि मयूर प्रकाश जगदाळे (दोघेही रा. मुर्टी, ता. बारामती जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बारामतीचे पुरवठा निरीक्षक रवींद्र दशरथ पारधी यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 मार्च रोजी रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान संकेत जगदाळे याच्या मुर्टी येथील बंद असलेल्या कुक्कुटपालन केंद्रामध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संकेत जगदाळे यांचे मुर्टी येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. रात्रीच्या सुमारास हे दोघेजण हयगयीने मानवी सुरक्षेची कोणतीही काळजी न करता घरगुती सिलेंडरमधील गॅस हा कमर्शियल सिलेंडरमध्ये भरत होते. त्यावेळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.
या कारवाईत 1 लाख 21 हजार 500 रुपयांच्या किमतीचे प्रत्येकी साडेचार हजार रुपये किंमत असलेले तब्बल 27 सिलेंडर, तसेच हिंदुस्तान पॅट्रोलियम कंपनीचे 1 लाख 66 हजार 500 रुपये किमतीचे 37 व्यावसायिक सिलेंडर, तर 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे घरगुती 86 सिलेंडर देखील जप्त करण्यात आले आहेत.
तसेच 3 लाख रुपयांचा अशोक लेलँड कंपनीचा फिक्कट पिवळ्या रंगाचा टेम्पो, वजन काटा, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्युमिनियमच्या नळ्या असा 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास परीविक्षाधीन अधिकारी दर्शन दुगड करत आहेत.