आदित्य बोराटे

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील बाभूळगावच्या हद्दीत सेवा रस्त्यालगत विटभट्टीशेजारी बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल व मॅगझीन असा सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सुरज अनिल निकम (वय २२, रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार निलेश महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी बाभूळगाव पाटीजवळील विटभट्टीशेजारी निकम हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदा व विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीन आढळून आले.

पोलिसांनी पिस्तूल व मॅगझीन जप्त करून निकम याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.







