वाशिम : जिल्ह्यातील कारंजा ते खेर्डा दरम्यान शेतात काम करणाऱ्या दोन मजुरांमध्ये भाजी बनवण्यावरून झालेल्या वादातून एका मजुराची लोखंडी पहारीने हत्या करून मृतदेह शेतातील खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला कारंजा पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

कारंजा येथील संतोष तिडके यांच्या शेतात मध्यप्रदेशातील दिनेश उईके आणि युवराज बोरखडे हे दोघे मजुरीचे काम करत होते. रविवारी दोघांनी दारू प्यायल्यानंतर स्वयंपाकावरून त्यांच्यात वाद झाला. दिनेश उईके हा युवराज बोरखडे याला भाजी बनवण्यास सांगत होता. युवराज केवळ पोळ्या करत असल्याने त्यावरून दोघांमध्ये वाद वाढला.

वाद विकोपाला गेल्यानंतर दिनेश उईके याने युवराज बोरखडे याच्यावर लोखंडी पहारीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात युवराजचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेशने शेतात खड्डा खोदून युवराजचा मृतदेह त्यात पुरला आणि तेथून पसार झाला.

दुसऱ्या दिवशी शेतमालक संतोष तिडके शेतात गेले असता त्यांना दोन्ही मजूर दिसले नाहीत. त्यांनी दोघांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. युवराजचा फोन बंद होता, तर दिनेश फोन उचलत नव्हता. वारंवार फोन केल्यानंतर दिनेशने अखेर संतोष तिडके यांना युवराजची हत्या करून त्याचा मृतदेह शेतात पुरल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने स्वतःचा मोबाईल बंद केला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतोष तिडके यांनी कारंजा शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शेतातील खड्डा खोदून युवराजचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, आरोपी दिनेश उईके याचा शोध घेत कारंजा पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलिसांकडून सुरू आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.






