पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 26 सप्टेंबर रोजी पुण्यात हे आंदोलन होणार होते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गर्दीची शक्यता लक्षात घेता आंदोलन आणि मोर्चांना परवानगी दिली जात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवार यांनी पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू असल्याने परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यानंतर रोहित पवार यांनी पोलिसांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची भूमिका कायम असल्याचे सांगितले.

MPSC अध्यक्षांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच तुकाराम मुंढे आणि सुनील गेडाम यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले.

गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करायचे नसल्याची विद्यार्थ्यांची भूमिका होती. मात्र 26 सप्टेंबरला आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याने आता 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता गरवारे रोडवर आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. सरकारला आंदोलनापूर्वी 15 विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करायची असल्यास त्यासाठी तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नसल्याचा दावा पवार यांनी केला. तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळात क्लासचालकांचा समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले. सुमारे 70 ते 80 विद्यार्थ्यांना नोटिसा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलन ठिय्या स्वरूपाचे असेल आणि ते किती दिवस चालेल हे सांगता येणार नसल्याचे पवार म्हणाले. काही विद्यार्थी उपोषणाच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्याविरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या मान्य झाल्यास सरकारचा जाहीर सत्कार करू, असेही ते म्हणाले. तसेच 70 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात राहुल गांधी यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना विनंती करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.






