पुणे : वडिलोपार्जित घर आपल्या जागेत असल्याचा दावा करत घर खाली करण्यास विरोध करणाऱ्या तरुणासह त्याच्या वडिलांना दगडफेक आणि मारहाण केल्याचा प्रकार मांजरी खुर्द येथील पवार वस्तीमध्ये घडला. यावेळी स्विफ्ट कार, क्रेटा आणि टँकरवर दगडफेक करून काचा फोडत नुकसान केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार 20 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

या प्रकरणी मयुर विठ्ठल पवार (वय 30, रा. पवार वस्ती, मांजरी खुर्द) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संदेश सिताराम पवार (वय 26), कुणाल सिताराम पवार (वय 24), शिवाजी किसन पवार (वय 42), सोमनाथ सुंदरभाऊ पवार (वय 36), दीपक हरिलाल पवार (वय 38), राहुल हरिलाल पवार (वय 41) आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर पवार यांच्या वडिलांच्या नावावर मांजरी खुर्द येथील गट क्रमांक 628 मध्ये पाच गुंठे जागा असून त्यावर त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. तर आरोपींपैकी संदेश, कुणाल आणि शिवाजी पवार यांची गट क्रमांक 629 मध्ये 20 गुंठे जमीन आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जागेची खासगी मोजणी केली होती. त्यावेळी मयुर पवार यांचे घर अर्धे त्यांच्या जागेत येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत मयुर यांनी सरकारी मोजणीसाठी अर्ज केला असून मोजणीनंतर आपल्या वाट्याला येणारी जागा देण्याची तयारी दर्शवली होती.

20 सप्टेंबर रोजी संदेश पवार याने मयुर यांना फोन करून मोजणी कधी होणार, अशी विचारणा केली. त्यावर मयुर यांनी मोजणी लवकर होईल असे सांगितले. मात्र, त्यानंतर संदेशने आजच घर पाडून जागेचा ताबा घेणार असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.
रात्री संदेश, कुणाल, शिवाजी, सोमनाथ, दीपक आणि राहुल पवार हे चार ते पाच साथीदारांसह कार व दुचाकीने घटनास्थळी आले. त्यांच्यासोबत जेसीबीही असल्याचे तक्रारीत नमूद आहे. घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर संदेशने मयुर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांनी शिवीगाळ करत दगडफेक केल्याचा आरोप आहे. यात मयुर यांच्या हाताला आणि बरगडीला दुखापत झाली.
मयुर यांचे वडील विठ्ठल पवार आणि पत्नी नम्रता पवार यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रतिक आव्हाळे आणि विशाल आव्हाळे पुढे आले असता त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.
यावेळी स्विफ्ट कार, क्रेटा आणि टँकरवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. वाहनांच्या दरवाजांचेही नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच संदेश पवार याने गाडीमधून कोयता काढण्यास सांगून मयुर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. घटनेनंतर सर्वजण तेथून निघून गेले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विठ्ठल घुले करीत आहेत.






