पुणे : मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. यादरम्यान आता त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यावरून आता जरांगे पाटील संतापले असून त्यांनी आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान गरिबांना मदत करणाऱ्या सहकाऱ्यांवर आयकर विभागाकडून चौकशीची कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “आरक्षणासाठी एकत्र आलेल्या श्रीमंत मराठ्यांनी गरीब बांधवांना मदत करायची नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

जरांगे पाटील म्हणाले की, सध्या हातात सत्ता असल्यामुळे मराठा आंदोलक आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. केंद्रीय यंत्रणा आणि आयकर खात्याची भीती दाखवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असला, तर आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहोत. सत्तेचा वापर करून सुरु असलेला हा त्रास आम्ही सहन करणार नाही आणि अशा कारवायांना घाबरून आरक्षण मिळवण्याचा लढा सोडणार नाही.

आमदार संजय शिरसाट आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या मतांवर निवडून आलेले लोकच आता आंदोलकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावत आहेत. सुमारे 10 ते 12 हजार समर्थकांना टार्गेट केले जात असून, आंदोलकांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे. सत्ता नेहमीच राहत नसते, हे विसरू नका. 2029 ची वेळही लवकरच येईल असा इशारा देत, सर्व आंदोलक तुरुंगात जाण्यासाठीही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जरागे पाटील यांनी निकटवर्तीयांवरील आयकराच्या चौकशीला घाबरणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. आंदोलनाला मदत करणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.







