नाशिक : नाशिक येथील डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास आता डिजिटल पुराव्यांच्या दिशेने वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेले पती डॉ. नीलेश जेजूरकर आणि त्यांची सहकारी डॉ. स्वाती चव्हाण यांच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार आहे.

गंगापूर रोड भागातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये 6 मार्च 2026 रोजी डॉ. मनीषा जेजूरकर यांचा मृत्यू झाला होता. डॉ. मनीषा यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. नीलेश यांच्याविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा नोंदवला. तक्रारीत डॉ. स्वाती चव्हाण यांच्यासोबतच्या संबंधांचाही उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि अगदी 17 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी डॉ. नीलेश यांना नाशिकच्या द्वारका सर्कल येथून ताब्यात घेतले होते.

दरम्यान आता या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार दोघांचीही रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासात आरोपी सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले, ज्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीचा अधिकार राखून ठेवत दोघांची रवानगी जेलमध्ये केली.

दरम्यान, पोलिसांनी डॉ. नीलेश आणि डॉ. स्वाती या दोघांचे मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. या फोनमधील कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅटिंग आणि इतर डिजिटल डेटाचा कसून तपास केला जात आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता असून, गरजेनुसार पोलीस पुन्हा आरोपींच्या कस्टडीची मागणी करू शकतात. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या फॉरेन्सिक अहवालाकडे लागले आहे.







