पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्न आस्थापनांची तपासणी करत मोठी कारवाई केली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 18 लाख 43 हजार 364 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत चार आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका आस्थापनाला सील करण्यात आले असून 23 लाख रुपये किमतीची दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

पुणे विभागातील विविध आस्थापनांची तपासणी करताना प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थ आढळून आले. पिंपरी येथील मे. रसरंग या आस्थापनातून 29 हजार 500 रुपये किमतीचा 59 किलो खवा जप्त करण्यात आला. खेड येथील मे. सहारा डेअरी प्रॉडक्ट्समधून 61 हजार 600 रुपये किमतीचा 1 हजार 808 किलो शाही स्वीट हलवा आणि 1 लाख 62 हजार 200 रुपये किमतीचा 811 किलो ए-1 स्वीट हलवा मिसब्रँडेड असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

बिबवेवाडी येथील मे. मंगल नॅचरोकेअरमधून 23 हजार 316 रुपये किमतीचे 39.15 किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले. आंबेगाव पठार येथील मे. गालखा देवी स्वीट्समधून दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी 7 हजार 500 रुपये किमतीची 30 किलो सोनपापडी जप्त करण्यात आली. तर पिंपरी येथील मे. गणेश स्वीट्समधून 38 हजार 80 रुपये किमतीचा 119 किलो मिठामावा जप्त करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात तपासणी आणि कारवाई सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे विभागातील दोन आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. पाषाण येथील आरपी हॉस्पिटॅलिटीज (रंगला पंजाब) आणि कर्वेनगर येथील मनीषा डोसा सेंटर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा परवान्याच्या अट क्रमांक 3 तसेच ‘परिशिष्ट-4’मधील स्वच्छता आणि आरोग्यविषयक मानकांचे उल्लंघन तपासणीत आढळून आल्याने हे परवाने निलंबित करण्यात आले.







