पुणे: चाकण औद्योगिक परिसरात शुक्रवारी (ता.13) दुपारी पीएमपीएलच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने बसमधील सुमारे 50 प्रवासी वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. (PMPL electric bus catches fire in Chakan Industrial Estate)

निगडी येथून महाळुंगे एमआयडीसीकडे जाणारी ही विशेष बस कामगारांसाठी सुरू करण्यात आली होती. बस चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीसमोरून जात असताना अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच बसच्या मागील भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.
चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. प्रवाशांनीही शांतता राखल्याने कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. काही प्रवाशांना धूर लागल्याची किरकोळ तक्रार होती; मात्र गंभीर दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि काही वेळातच आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत बस संपूर्ण जळून खाक झाली होती.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किट किंवा बॅटरी यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
औद्योगिक वसाहतीत कामगारांची मोठी वर्दळ असताना ही घटना घडल्याने परिस्थिती गंभीर बनू शकली असती. मात्र चालक आणि वाहकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.







