थेऊर : कुटुंबातील मयत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शिवरकर कुटुंबातील सदस्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता घराशेजारी वृक्षारोपण करुन आदर्श निर्माण केला आहे. आळंदी म्हातोबाची येथील उद्योजक सुदर्शन शिवरकर यांचे वडील बाळासाहेब मारुती शिवरकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
अस्थिविसर्जन प्रचलित पद्धतीप्रमाणे नदीपात्रात करतात. मात्र आळंदी म्हातोबा येथील तरुण मागील चार वर्षापासून नदीच्या पाण्यात अस्थींचे विसर्जन न करता त्या अस्थी खड्ड्यात विसर्जित करून त्यावर झाड लावत आहेत. त्यानुसार आठवण राहावी म्हणून चिंचेचे झाड लावले व नियमानुसार अंत्यविधी झाल्यानंतर सुदर्शन शिवरकर यांनी पर्यावरणाचा विचार करून एक आदर्श उपक्रमाला साथ दिली.
सध्या वाढते तापमान व पाणी प्रदूषण त्यामुळे वाढत चाललेले विविध आजार याची जाण असल्याने येथील तरुणांनी पर्यावरण जपले जावे, यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. याला परिसरात प्रतिसादही मिळत आहे. शिवरकर कुटुंबियातील पत्नी लताबाई शिवरकर, मुलगा सुदर्शन शिवरकर तसेच मुलगी शुभांगी होले यांनी सामाजिक जाणिवेतून या उपक्रमाला प्रतिसाद देत घराजवळ वृक्ष लावून अस्थी विसर्जित केली. प्रवाही पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे आणि वृक्ष लागवड व्हावी, यासाठी पंचक्रोशीत रक्षाविसर्जन रानातच करुन वृक्ष लागवड चळवळ सुरू आहे.
दरम्यान, या कामासाठी पर्यावरण समितीचे सदस्य संतोष शिवरकर, रोहित शिवरकर, ओंकार शिवरकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रकाश शिवरकर माऊली जवळकर, गणेश शिवरकर, किरण होले, मंगेश भागवत, सुमेध होले, स्वप्नील शिवरकर, तेजस शिवरकर, दिलीप शिवरकर, पार्थ शिवरकर, डॉ. रसिका शिवरकर, ज्योती घुमटकर, सायली बोराटे, नंदाताई आल्हाट, संगिता बोरावके, सारिका भागवत व आप्तेष्ट नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.