शिरूर, ता. ७ : शिरूर तालुक्यातील निमोणे गावात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर पिस्तुलाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ६) सायंकाळी घडली आहे. आरोपीने आधी पिस्तुलाच्या बटाने डोक्यात वार करून जखमी केले आणि त्यानंतर पिस्तुल थेट डोक्याला लावून ट्रिगर दाबत ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पिस्तुलातील गोळी अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

याप्रकरणी शरद मनोहर काळे (वय ४०, रा. निमोणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत ज्ञानदेव काळे (रा. निमोणे, ता. शिरूर) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद काळे हे निलायम हॉटेल बार अँड रेस्टॉरंट येथे मित्रांसोबत जेवणासाठी गेले होते. हॉटेलच्या मागील गार्डनमध्ये जेवण सुरू असताना आरोपी संकेत काळे हा एका कॉटेजमधून बाहेर आला आणि “शऱ्या, इकडं ये” अशी हाक मारली. मात्र, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत असल्याने आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन फिर्यादीने त्याच्याकडे जाणे टाळले.

यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने कमरेतील प्लास्टिकच्या पिशवीतून पिस्तुल बाहेर काढत शिवीगाळ केली. त्यानंतर तो थेट फिर्यादीजवळ येऊन पिस्तुलाच्या बटाने दोन वेळा डोक्यात प्रहार करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता त्याने पिस्तुल फिर्यादीच्या डोक्याला लावून “आत्ता तुला खल्लास करून तुझ्या बापाकडे पाठवतो” अशी धमकी देत ट्रिगर दाबला. मात्र, पिस्तुलातील गोळी अडकल्याने ती सुटली नाही आणि फिर्यादीचा जीव थोडक्यात बचावला. गोळी न सुटल्याने आरोपी तेथून पळून गेला. जाताना “थांब, मी परत येतो… मग तुला संपवतो,” अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या थरारक प्रकारामुळे निमोणे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.







