पुणे : महाराष्ट्र शासनाची ‘लेक लाडकी योजना’ राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या मुलींना तिच्या जन्मापासून वय वर्षे 18 पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण ₹1,01,000 ची आर्थिक मदत दिली जाते. प्राप्त माहितीनुसार, सध्या एकट्या मुंबई शहर व उपनगरात मिळून 3,563 मुली या योजनेचा थेट लाभ घेत आहेत.

मुलीच्या संगोपनापासून ते तिच्या उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च सुलभ व्हावा यासाठी ही रक्कम पुढीलप्रमाणे पाच विविध टप्प्यांत वितरीत केली जाते:

मुलीचा जन्म झाल्यावर: ₹5,000

पहिलीत प्रवेश घेताना: ₹6,000
सहावीत प्रवेश करताना: ₹7,000
अकरावीत प्रवेश करताना: ₹8,000
वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹75,000
या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी काही ठराविक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुलीचा जन्म 1 April 2023 किंवा त्यानंतर झालेला असावा.अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे तसेच वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना या योजनेचा फायदा घेता येतो. कुटुंबात 1 मुलगा आणि 1 मुलगी असल्यास मुलगी या लाभासाठी पात्र ठरते.
शेवटचा ₹75,000 चा हप्ता मिळण्यासाठी मुलगी 18 वर्षांची आणि अविवाहित असणे आवश्यक आहे. तसेच काही वेळेस कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
सध्या मुंबई शहरात 671 आणि मुंबई उपनगरांमध्ये 2,892 अशा एकूण 3,563 लाभार्थी मुलींची नोंद झाली आहे. जर तुमच्या घरात 1 April 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल, तर तुम्ही सरकारी नियमांनुसार या योजनेचा लाभ घेऊ शकता.







