पळसदेव : जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 55 वर्षीय महिलेला तिघांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना पळसदेव (ता. इंदापूर) येथे घडली. यामध्ये महिलेच्या डोक्याला काठीने मार लागल्याने गंभीर दुखापत झाली असून, डोक्याला चार ते पाच टाके पडले आहे.

याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने यांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला आहे. त्यानुसार शिवाजी रूपसिंग भुई, रेखा भुई आणि अनिल रूपसिंग भुई यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शिवाजी भुई यांच्यासोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. मार्च 2026 मध्ये शिवाजी यांच्या पत्नीला या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही परस्पर संमतीने संबंध तोडले होते.

दरम्यान, फिर्यादी या सुनेचा ब्लाउज आणण्यासाठी संजय भुई यांच्या घराकडे 29 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एकट्या जात होत्या. त्यावेळी शिवाजी भुई व त्यांची पत्नी रेखा भुई यांनी त्यांना शिवीगाळ करत घराजवळ का आल्या. त्यानंतर रेखा भुई यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. त्याचवेळी अनिल भुई तेथे आला. त्याने फिर्यादी यांचे दोन्ही हात पकडल्यावर शिवाजी भुई यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर रेखा भुई यांनी लाकडी काठीने त्यांच्या डोक्यात मारली.

काठीचा मार लागल्यानंतर फिर्यादी यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला आणि चक्कर आल्याने त्या जमिनीवर बसल्या. त्यानंतर शिवाजी व अनिल यांनी “तुला आणि तुझ्या मुलाला जीवे मारून टाकीन,” अशी धमकी दिली. या झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळ्याची सोन्याची पोत पडून हरवले आहे. या घटनेनंतर पीडिता यांना उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.







