पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान पादचारी भुयारी मार्ग तयार करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी आरसीसी बॉक्स बसवण्यासाठी उद्या रविवारी, 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:40 ते दुपारी 3:40 या वेळेत दोन्ही मार्गांवर चार तासांचा विशेष ट्रॅक ब्लॉक घेतला जाईल. या तांत्रिक कामामुळे पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

ब्लॉकच्या कालावधीत पुणे आणि लोणावळा दरम्यान धावणाऱ्या चार उपनगरीय लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये गाडी क्र. 99814: पुणे ते लोणावळा लोकल, गाडी क्र. 99818: पुणे ते लोणावळा लोकल गाडी क्र. 99813: लोणावळा ते पुणे लोकल गाडी क्र. 99817: लोणावळा ते शिवाजीनगर लोकल यांचा समावेश आहे

एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई–कोल्हापूर एक्सप्रेस (11029): रविवारी सकाळी 8:40 वाजता सीएसएमटी मुंबईवरून सुटणारी ही गाडी 3 तास 30 मिनिटे उशिराने, म्हणजेच दुपारी 12:10 वाजता सुटेल.
चेन्नई–मुंबई एलटीटी एक्सप्रेस (12164): शनिवारी प्रवास सुरू करणारी ही ट्रेन सोलापूर किंवा पुणे विभागात 3 तास 30 मिनिटांसाठी थांबवून (रेग्युलेट करून) चालवली जाईल.
रेल्वेच्या मते, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी हे काम आवश्यक आहे. या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी ‘NTES’ ॲप किंवा enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावरून आपल्या गाडीची स्थिती तपासून घेऊनच बाहेर पडावे.






