शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराजवळ असलेल्या रामलिंग रस्ता परिसरात एका बंदिस्त घरातून संशयास्पद प्रकार समोर आला आहे. या घरामध्ये 12 फुटांपेक्षा अधिक खोल खड्डा आणि अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचा संशय असलेले साहित्य आढळल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या घरात अनोळखी व्यक्तींची ये-जा सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रामलिंग रस्ता परिसरातील एका घरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाहेरील व्यक्तींची वारंवार ये-जा होत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. या हालचाली संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिली.

यानंतर बजरंग दलाचे अजिंक्य तारू आणि निशिकांत काळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. या घरात नेमके काय सुरू होते, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
घटनास्थळासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, घरामध्ये मोठा खड्डा आणि काही संशयास्पद वस्तू आढळल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या परिसरातील काही व्हिडिओ चित्रणामुळेही विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, या ठिकाणी नेमका कोणता प्रकार सुरू होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे रामलिंग रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून संबंधित बाबींची तपासणी केली जात आहे. या प्रकरणामागील नेमके कारण काय आहे आणि घरात आढळलेल्या साहित्याचा उपयोग कशासाठी केला जात होता, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






