पुणे : पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात एका राजकीय नेत्याच्या समर्थकांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिसावरच जीवघेणा हल्ला केला आहे. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्या डोक्यावर 3 टाके पडले आहेत.

ही घटना घडली तेव्हा रुग्णालयात काही कारणावरून तणाव निर्माण झाला होता. काही जण तिथल्या डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून तिथे उपस्थित असलेले पोलीस ठाणे अंमलदार अमोल शिंदे यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि डॉक्टरांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी थेट पोलिसावरच हल्ला चढवला. त्यांना डोक्याला गंभीर दुखापत होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली.
या घटनेमुळे खाकी वर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांवरच अशा प्रकारे हात उचलल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दल आणि वैद्यकीय वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संबंधित हल्लेखोरांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा दाखल केला जात आहे. सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला मारहाण केल्यामुळे आरोपींवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.








