आदित्य बोराटे

इंदापूर: उजनी धरण परिसरातील प्रस्तावित विविध प्रकल्पांविरोधात शेतकरी आणि धरणग्रस्तांनी आंदोलनाची हाक दिली आहे. एआय डेटा सेंटर, अणुऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी आणि सौरऊर्जा प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उजनी येथील उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
या प्रकल्पांमुळे उजनी परिसरातील पाणी, शेती आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत आंदोलकांनी प्रकल्पांना विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात रविवारी (दि. २५) इंदापूर येथे भीमा नदी परिसरातील शेतकरी व धरणग्रस्तांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

या आंदोलनात माजी मंत्री महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह शेतकरी, मच्छीमार आणि महिला शेतकरी सहभागी होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

‘हा उजनीच्या अस्तित्वाचा लढा’; महारुद्र पाटील यांची भूमिका
“हा प्रकल्प जगातून हाकलून दिलेला आहे. ठाणे येथेही नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. असा प्रकल्प आम्ही उजनीत कदापिही होऊ देणार नाही. हा लढा उजनीच्या अस्तित्वाचा आहे,” अशी भूमिका महारुद्र पाटील यांनी मांडली. उजनी परिसरातील प्रकल्पांचा प्रश्न ऐरणीवर आणत त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मोर आणि इतर पक्ष्यांबाबत चौकशीची मागणी
उजनी परिसरात प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून मोर आणि इतर पक्षी दिसेनासे झाल्याचा दावा कृष्णा ताटे यांनी केला. या पक्ष्यांचे नेमके काय झाले, याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच एआय डेटा सेंटरमधील पाण्याचा वापर आणि सांडपाण्यामुळे भीमा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान भीमा नदीत स्नान करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याचाही विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले.
दररोज तीन कोटी लिटर पाण्याच्या वापराचा दावा
उजनीतील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत प्रस्तावित प्रकल्पांसाठी दररोज तीन कोटी लिटर पाणी लागणार असल्याचा दावा अमोल भिसे यांनी केला. पाण्याच्या वापरामुळे स्थानिक पातळीवर टंचाई निर्माण होण्याची, तसेच गरम पाणी नदीत सोडल्यास मासे आणि इतर जलचरांवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रकल्प रद्द करण्यासाठी एकजुटीचे आवाहन
उजनी धरण परिसरातील पाणी, शेती, पर्यावरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी, मच्छीमार, महिला शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महारुद्र पाटील, कृष्णा ताटे आणि अमोल भिसे यांनी केले.






