उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील आश्रम रोड परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाख 22 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असताना ही चोरी झाल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी किरण पोपट गोते (वय 31, रा. आश्रम रोड, साई मेडिकलच्या पाठीमागे, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोते हे फुलझाडांची नर्सरी चालवतात. गुरुवारी (ता. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते आळंदी म्हातोबाची येथील नर्सरीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांची आई घराला कुलूप लावून नेहमीप्रमाणे घराची चावी शेजारी असलेल्या चप्पल-बुटांच्या स्टँडमधील एका बुटात ठेवून बिवरी येथील शेतात काम करण्यासाठी निघून गेल्या.

सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास घरात झाडलोट करताना आईला बेडरूममध्ये दागिन्यांचा डबा रिकामा असल्याचे दिसले. त्यानंतर घरातील कपाटे तपासली असता सोन्याचे कानातील टॉप-वेल, पेंडल, सोन्याची चैन, गणपतीचे पेंडल, जिरामणी आणि चांदीचे पैजण असे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. या दागिन्यांची एकूण किंमत 2 लाख 22 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप किंवा दरवाजा उचकटल्याचे दिसून आले नसतानाही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार सलीम शेख करीत आहेत.






